१. 'महावनमित्र' बद्दल

'महावनमित्र' या पोर्टलचा उद्देश

अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्यता) अधिनियम २००६, नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने 'महावनमित्र' संकेतस्थळ विकसित केले गेले आहे. अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी समूहातील व्यक्तींना / समूहांना अथवा गाव / पाड्यांना, वन जमिनीवरील वैयक्तिक अथवा सामूहिक वनहक्क दावे सुरळीतपणे दाखल करता यावे, दाखल केलेल्या दाव्यांची सद्यस्थिती पाहता यावी आणि वनहक्कांचे टायटल (प्रमाणपत्र) विनासायास मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या पोर्टलची निर्मिती केली गेलेली आहे.

महाराष्ट्र शासनाने ही प्रणाली का विकसित केली ?

माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्यता) अधिनियम २००६, नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ या कायद्याची वेळेत आणि प्रभावी अंमलबजावणी करता येणे शक्य आहे. संगणक प्रणालीद्वारे वनहक्क दावे दाखल करणे, दाव्यांची पडताळणी करणे, निर्णय प्रक्रियेमध्ये एकसूत्रता यावी, त्यास समर्थन देता यावे व संपूर्ण महाराष्ट्रातील वनहक्क मान्यता देणेबाबतचे नियोजन करता यावे, एकत्रित आढावा घेता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने हि प्रणाली विकसित केली. ह्या कामी आदिवासी प्रशिक्षण आणि विकास संस्था, पुणे (TRTI) यांचे मार्गदर्शन आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्या. (MKCL) यांचे विनामूल्य सहकार्य लाभले आहे.

'महावनमित्र' प्रणालीचे फायदे काय ?

दावेदार ग्रामस्थांना / समूहांना अथवा गाव / पाड्यांना या कायद्याअंतर्गत मिळणारे हक्क हे कमीत कमी वेळेमध्ये आणि विनासायास मिळू शकणार आहेत. यामध्ये दावे दाखल करण्यासाठी ग्रामसभेला मदत करणारी ‘ग्राम वनहक्क समिती’, ग्राम वनहक्क समित्यांकडून आलेल्या वनहक्क दाव्यांची शहानिशा करणारी ‘उपविभागस्तरीय समिती’ आणि दाव्यांवर अंतिम निर्णय घेणारी ‘जिल्हास्तरीय समिती’ या सर्वांना आपापली कामे नियोजनपूर्वक करता येतील. माहिती तंत्रज्ञानाची साथ मिळाल्याने सादर झालेले दावे कुठेही खोळंबून राहणार नाहीत. विहित मुदतीमध्ये त्यावर निर्णय घेतले जातील. प्रणालीमार्फत होणाऱ्या सर्व प्रक्रियेची रीतसर नोंद राहील. तसेच दाव्यांची सद्यस्थितीही समजू शकेल.

२.'महावनमित्र' पोर्टलची प्रक्रिया

१. ग्राम वनहक्क समित्यांची प्रणालीमध्ये नोंदणी करणे.

अ. ग्रामसेवक त्यांना देण्यात आलेल्या लॉगीनमधून सर्वप्रथम आपल्या अखत्यारीतील गावनिहाय सर्व पाडे / तांडे / टोले / वाड्या यांतील सध्याच्या ग्राम वनहक्क समित्यांची माहिती 'महावनमित्र' प्रणालीमध्ये भरतील.

ब. ग्रामसेवक ज्या गाव / पाड्याच्या ठिकाणी ग्राम वनहक्क समिती बनू शकते अशा गाव / पाड्यांसाठी महावनमित्र प्रणालीमध्ये समितीची माहिती भरतील. त्यासाठीचा पुरावा म्हणून ग्रामसभा ठराव अपलोड करतील.

२. वैयक्तिक लॉगीनमधून वैयक्तिक वनहक्क दावे नोंदविणे..

‘महावनमित्र’ प्रणालीमध्ये जर आपल्या गाव / वाडी / पाडा / तांडा / टोला यासाठी स्वतंत्र ग्रामवनहक्क समितीची नोंद झाली असेल तरच वैयक्तिक वनहक्क दावा नोंदविता येईल. यासाठी वैयक्तिक दावेदाराला mahavanmitra.mkcl.org या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. तेथे नोंदणी या बटणावर क्लिक करून वैयक्तिक माहिती भरावी आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. लॉगीन आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉगीन करून नवीन दावा तेथे नोंदविता येतो. त्यासाठी आवश्यक ती माहिती भरण्याची आणि कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा दिली गेली आहे. येथे जुन्या दाव्याच्या सद्यस्थितीची माहिती सुद्धा घेता येते.

३. ग्राम वनहक्क समितीकडे वनहक्क दावे नोंदविणे.

अ. ग्राम वनहक्क समिती आपल्या लॉगीन मधून वनहक्क दाव्यांसंदर्भात आवश्यक ती संपूर्ण माहिती भरेल आणि प्राप्त दाव्यांची 'महावनमित्र' प्रणालीमधून निश्चिती करेल.

४. वनहक्क दावे पडताळणी सभेचे आयोजन करणे.

अ. ग्रामवनहक्क समित्यांकडे नोंदविलेल्या गेलेल्या दाव्यांच्या संख्येच्या आधारे तहसीलदार हे संबंधित गाव / पाडे यांच्यासाठी वनहक्क दावे पडताळणी कार्यक्रमांचे नियोजन 'महावनमित्र' प्रणालीच्या माध्यमातून करतील.

ब. ग्रामसेवकांच्या मदतीने ग्राम वनहक्क समिती पार पडलेल्या पडताळणी कार्यक्रमाचा तपशील 'महावनमित्र' प्रणालीमध्ये भरेल .

५. ग्राम वनहक्क समितीकडून उपविभागस्तरीय समितीकडे दावे दाखल करणे.

अ. ग्राम वनहक्क समिती वनहक्क दावा / दावे ग्रामसभेसमोर मांडण्यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करतील. त्यासाठीचे आवश्यक नमुने 'महावनमित्र' प्रणालीमधून डाऊनलोड करतील.

ब. शेवटी सर्व कागदपत्रे स्कॅन करून 'महावनमित्र' प्रणालीवर अपलोड करतील आणि दावा उपविभागस्तरीय समितीकडे पाठवतील.

६. उपविभागस्तरीय समितीमार्फत दाव्यांची शहानिशा करणे.

अ. उपविभागस्तरीय समिती त्यांच्या लॉगीन मधून आलेल्या सर्व दाव्यांच्या कागदपत्रांची शहानिशा करतील.

ब. कागदपत्रांची शहानिशा / छाननी करताना प्रत्येक जमा कागदपत्रापुढे आपला शेरा नोंदवतील.

क. वनहक्क दाव्यासंदर्भात कागदपत्रांची पूर्ण शहानिशा केल्यावर सदर दाव्याची 'महावनमित्र' प्रणालीच्या माध्यमातून जिल्हास्तरीय समितीकडे शिफारसीकरिता पाठवेल.

७. जिल्हास्तरीय समितीमार्फत दाव्यांवर निर्णय घेणे.

अ. उपविभागस्तरीय समितीने शिफारस केलेल्या दाव्यांची माहिती जिल्हास्तरीय समिती आपल्या 'महावनमित्र' लॉगीनच्या माध्यमातून घेईल.

ब. शिफारस केलेल्या प्रत्येक वनहक्क दाव्यावर आपला निर्णय 'महावनमित्र' प्रणालीच्या माध्यमातून नोंदवेल.

क. मंजूर झालेल्या प्रत्येक वनहक्क दाव्याचे 'महावनमित्र' प्रणालीमध्ये नमुना प्रमाणपत्र तयार होईल.

ड. जिल्हास्तरीय समिती ही तयार नमुना प्रमाणपत्र डाऊनलोड करून त्यावर आवश्यक सही शिक्का करून ते प्रमाणपत्र 'महावनमित्र' प्रणालीमधून अपलोड करेल.

इ. अपलोड झालेले वनहक्क दावा मंजुरीचे प्रमाणपत्र संबंधित ग्राम वनहक्क समितीच्या लॉगीन मध्ये दिसू लागेल.