अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्यता) अधिनियम २००६, नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ या कायद्याची वेळेत आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने 'महावनमित्र' प्रणाली विकसित केली गेली आहे. अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक समूहाच्या पात्र व्यक्तींना तसेच त्यांच्या गाव / पाड्यांना आपापले वनहक्क दावे बिनचूक आणि वेळेमध्ये दाखल करता यावे, नव्या तसेच जुन्या दाव्यांची सद्यस्थिती पाहता यावी आणि वनहक्कांचे टायटल विनासायास मिळावे हा या प्रणालीमागील उद्देश आहे.

सर्वप्रथम आपण इंटरनेट ब्राउझर वर जाऊन mahavanmitra.mkcl.org या वेबसाईटला भेट देऊन लॉगीन करावे. वापरकर्ते जसे की, ग्रामवनहक्क समिती, उपविभागस्तरीय समिती, जिल्हास्तरीय समिती, ग्रामसेवक, तहसीलदार, वनहक्क कायदा सुलभक अशा सर्वांसाठी तेथे लॉगीनची सुविधा दिलेली आहे. वैयक्तिक दावेदारांना मात्र तेथे नोंदणी करून लॉगीन आयडी मिळवावा लागतो जेणेकरून आपल्या स्वतंत्र लॉगीनच्या माध्यमातून ते या प्रणालीचा वापर करू शकतात.

गावांचे प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक, संबंधित गावांतील अथवा पाडे / तांडे / टोले / वाड्या येथील ग्राम वनहक्क समिती, उपविभागस्तरीय समिती कार्यालय याच बरोबर संबंधित शासकीय अधिकारी यांना ही प्रणाली वापरता येईल. वैयक्तिक वनहक्क दाव्यांसाठी अनुसूचित जमातीचे किंवा इतर पारंपारिक वननिवासी असलेले ग्रामस्थ सुद्धा ही प्रणाली वापरू शकतात.

· ग्रामसेवक आपल्या लॉगीन मधून गाव, पाडे / तांडे / टोले / वाड्या / वस्त्या येथील ग्राम वनहक्क समित्यांची प्रणालीमध्ये नोंद करतील. ज्या ठिकाणी वनहक्क समित्या नाहीत त्या गाव अथवा पाड्यांसाठी प्रणालीमधून समित्या गठीत करण्यासाठी पुढाकार घेतील.

· • वैयक्तिक दावेदार वेबसाईटवर जाऊन नोंदणी करतील. आपला लॉगीन आयडी आणि पासवर्ड तयार करतील. त्याच्या सहाय्याने लॉगीन करून ते अपलादावा रीतसर नोंदवतील. त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया टप्प्याटप्प्याने तेथे पार पडतील जसे की, दाव्याची माहिती भरणे, योग्य ती आवश्यक कागदपत्रे डाऊनलोड/ अपलोड करणे इत्यादी.

· वनहक्क समिती आपल्या लॉगीन मधून दावेदारांचे दावे नोंदवतील आणि दाव्यांच्या पडताळणी संदर्भात प्रणालीच्या माध्यमातून केल्या गेलेल्या पडताळणी कार्यक्रम नियोजनानुसार पडताळणी सभा तपशील भरतील, दाव्यांच्या पुष्ठ्यर्थ आवश्यक ती सर्व माहिती आणि कागदपत्रे डाऊनलोड, स्कॅन आणि अपलोड करून प्रणालीच्या माध्यमातून उपविभागस्तरीय समितीकडे पाठवतील.

· उपविभागस्तरीय समिती त्यांच्या लॉगीन मधून आलेल्या सर्व दाव्यांच्या कागदपत्रांची शहानिशा करतील आणि प्रत्येक जमा कागदपत्रापुढे आपला शेरा नोंदवतील. वनहक्क दाव्यासंदर्भात कागदपत्रांची पूर्ण शहानिशा केल्यावर सदर दावा / दावे 'महावनमित्र' प्रणालीच्या माध्यमातून जिल्हास्तरीय समितीकडे शिफारसीकरिता पाठवेल.

· उपविभागस्तरीय समितीने शिफारस केलेल्या दाव्यांची माहिती जिल्हास्तरीय समिती आपल्या लॉगीनच्या माध्यमातून घेईल. शिफारस केलेल्या प्रत्येक वनहक्क दाव्यावर आपला निर्णय प्रणालीच्या माध्यमातून नोंदवेल. मंजूर झालेल्या प्रत्येक वनहक्क दाव्याचे ''महावन'' प्रणालीमध्ये नमुना प्रमाणपत्र तयार होईल. जिल्हास्तरीय समिती ही तयार नमुना प्रमाणपत्र डाऊनलोड करून त्यावर आवश्यक सही शिक्का करून ते प्रमाणपत्र ''महावन'' प्रणालीमधून अपलोड करेल.

या प्रणालीच्या माध्यमातून पात्र ग्रामस्थ अथवा गाव / पाडे तसेच वैयक्तिक दावेदार यांच्यासाठी दावे नोंदविण्यापासून ते वनहक्कांचे टायटल (प्रमाणपत्र) मिळेपर्यंतची प्रक्रिया अत्यंत वेगाने होणार आहे. यामध्ये वैयक्तिक दावेदार, ग्राम वनहक्क समिती, ग्रामसेवक, उपविभागस्तरीय समिती आणि जिल्हास्तरीय समिती या सर्वांना या कायद्यासंदर्भात आपापली कामे नियोजनपूर्वक करता येतील. माहिती तंत्रज्ञानाची साथ मिळाल्याने सादर झालेले वनहक्क दावे कुठेही खोळंबून राहणार नाहीत. विहित मुदतीमध्ये त्यावर निर्णय घेतले जातील. प्रणालीमार्फत होणाऱ्या सर्व प्रक्रियेची रीतसर नोंद राहील. तसेच दाव्यांची सद्यस्थितीही समजू शकेल.

वैयक्तिक दावेदारांना या प्रणालीच्या सहाय्याने अर्ज करणे सोपे होईल. अर्ज प्रणालीमध्ये थेट नोंदविला जाणार आहे तसेच त्याची पोचपावती सुद्धा घेता येणार आहे. प्रणालीमध्ये आपल्या अर्जाचा मागोवा घेणे सोपे होणार आहे कारण त्याची सध्या आपल्या अर्जावर काय प्रक्रिया झाली आहे आणि तो कोठे अडकून पडला आहे याची माहिती दावेदाराला त्यांच्या लॉगीन मध्ये ‘अर्जाची सद्यस्थिती’ यावर जाऊन चुटकीसरशी मिळणार आहे. कोठेही नाहक हेलपाटे मारावे लागणार नाहीत. थोडक्यात नागरिकांचा वनहक्क प्रमाणपत्र मिळेपर्यंतचा बराचसा त्रास कमी होणार आहे.

ग्रामवनहक्क समितीला गावांतील विविध दाव्यांची नोंद सुलभरीत्या घेता येणार आहे. दाव्यांच्या पुष्ठ्यर्थ आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करणे सोपे होणार आहे. सुरवातीला प्रणालीमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे भरून दिली गेलेली काही नमुना कागदपत्रे तेथून डाऊनलोड करता येणार आहे. त्यावर आवश्यक तेवढी माहिती भरून पुन्हा तेथेच ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करता येणार आहेत. दाव्याची कागदपत्रे घेऊन तालुक्याच्या प्रांत ऑफिस ला जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे अनेक हेलपाटे मारावे लागणार नाहीत. आणि आपल्या सर्व दाव्यांची सद्यस्थिती ही त्यांना बसल्या जागी समजणार आहे. एवढेच नव्हे तर जिल्हास्तरीय समितीने त्यांचा दावा मंजूर करून वनहक्क मान्यतेचे प्रमाणपत्र अपलोड केल्यावर लगेच ते ग्रामवनहक्क समितीला आपल्या लॉगीन मधून डाऊनलोड करता येणार आहे.

उपविभागस्तरीय समितीला सर्व दावे हे सॉफ्ट कॉपीज च्या स्वरूपात प्रणालीमध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दाव्यांची सर्व कागदपत्रे सांभाळायची आवश्यकता भासणार नाही. दाव्यांची कागदपत्रे पध्दतशीररीत्या अपलोड झालेली असल्याने त्यांची प्रणालीच्या माध्यमातून जलद गतीने शहानिशा / छाननी करणे सोपे होणार आहे. तसेच दाव्यांबाबत व योग्य त्या शेऱ्यासह ते जिल्हास्तरीय समितीकडे शिफारसीसाठी अथवा ग्रामवनहक्क समितींकडे पुनर्विचारार्थ पाठविणे सोपे होणार आहे. महावनमित्र अॅप माध्यमातून अगोदरच जीपीएस मोजणी करता येणे सोपे झाल्याने दाव्यांसाठी आवश्यक तेथे कराव्या लागणाऱ्या जीपीएस मोजणी साठीचा संपूर्ण वेळ वाचणार आहे. तसेच आवश्यक ते रिपोर्ट आणि विश्लेषण उपलब्ध होणार आहे.

उपविभागस्तरीय समिती प्रमाणेच जिल्हास्तरीय समित्या या प्रणालींचा उपयोग होणार आहे. यामध्ये दावा मंजूर केल्यावर प्रणालीच्या माध्यमातून संबंधित दावेदारांचे प्रमाणपत्र तयार केले जाणार आहे. त्याचा नमुना डाऊनलोड करून सही आणि शिके मारून ते अपलोड करायची सुविधा असल्याने तातडीने ते ग्रामवनहक्क समित्च्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. या सर्व प्रक्रियेमुळे जिल्हास्तरीय समितीला दावे वेळेत निकाली काढणे आणि तत्काळ त्याचे प्रमाणपत्र दावेदारांना देता येईल आणि त्यामुळे वाचलेल्या वेळ पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी कामी येईल.

आपण जितकी अचूक माहिती आपण भरू तितके आपले वनहक्क दावे लवकर निकाली काढण्यास मदत होणार आहे. जेथे जेथे माहिती भरणे आवश्यकच आहे तेथे * असे चिन्ह दाखविलेले आहे

'महावनमित्र' प्रणाली वापरण्यासाठी ही संपूर्णपणे मोफत आहे. आदिवासी प्रशिक्षण आणि विकास संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) यांनी ती महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री कार्यालयाला विनामूल्य उपलब्ध करून दिलेली आहे.. डिजिटल साक्षर असलेली कोणतीही व्यक्ती या सुविधेचा मोफत लाभ घेऊ शकते. परंतु जर आपल्याला कोणी ह्या प्रणालीमध्ये माहिती भरण्यास मदत करीत असेल तर आपण त्याला सेवाशुल्क देऊ शकतात. कारण संबंधित व्यक्ती अथवा संस्था त्यांचा अमूल्य वेळ तुमच्यासाठी खर्च करणार आहे. अर्थात यामध्ये किती सेवाशुल्क नागरिकांनी संबंधित व्यक्ती अथवा संस्थेला द्यावे हे येथे निश्चित सांगता येणार नाही. परंतु सदर सेवेसाठी किती सेवाशुल्क अदा करावे हे सेवा घेणारी व्यक्ती आणि सेवा देणारी व्यक्ती / संस्था यांनी परस्पर सामंजस्याने ठरवावे.

नक्कीच ! ही प्रणाली mahavan.mkcl.org या वेबसाईटवर उपलब्ध असेल तसेच Google Play Store मध्ये जाऊन MahaVanMitra या नावाने त्याचे अॅपसुद्धा डाऊनलोड करता येईल. वेबसाईट आणि अॅप या दोन्ही गोष्टी आपल्याला इंटरनेट असलेल्या मोबाईलवरून वापरता येईल

· नवे / प्रलंबित वनहक्क दावे वेळेत निकाली काढले जावेत यासाठी ही प्रणाली विकसित केली असून तिचे संपूर्ण काम हे मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने आदिवासी विकास प्रशिक्षण संस्था पहात आहेत. एमकेसीएल चा सहभाग हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ प्रणाली विकसित करण्यापुरता आहे. त्यामुळे दाव्यांचे प्रलंबित असणे, निकाली काढणे अथवा अमान्य करणे यासंदर्भात एमकेसीएल ला जबाबदार धरले जाऊ शकत नाही.

· एमकेसीएल ने ही प्रणाली सर्वांना वापरण्यास मोफत उपलब्ध करून दिलेली आहे तसेच ती आपल्या मोबाईलवर सुद्धा सुलभरीत्या वापरता येऊ शकते. पण ही प्रणाली वापरण्यासाठी आपल्याला कोणी मदत करीत असेल आणि त्यासाठी काही पैसे आकारत असेल तर पैसे देणे अथवा न देणे हा संपूर्णपणे वापरकर्त्याचा निर्णय आहे. एमकेसीएल ला त्याबत जबाबदार धरता येणार नाही.

· प्रणाली वापरताना कधी कधी अचानक काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. अशावेळी तातडीने मार्ग काढला जाऊन आपले काम कोठेही खोळंबून राहू नये यासाठी योग्य ती दक्षता घेतली जाईल.